Breaking News

 

 

निवडणूक कामासाठी जाताना कोल्हापुरात तलाठ्याचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मंगळवार (दि. २३) होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील साहित्य वाटप व जमा करण्याचे जबाबदारी असलेल्या पथकातील कर्मचारी जयंत चंद्रहार चंदनशिवे (वय ४६, तलाठी, गगनबावडा तहसीलदार कार्यालय, सध्या रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव) यांचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवार) सकाळी आठ वाजता कोल्हापुरातील दसरा चौकात घडला.

जयंत चंदनशिवे हे आज सकाळी आठच्या सुमारास निवडणुकीच्या कामासाठी घरातून बाहेर पडले. दसरा चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर जोरदार आपटले. त्यांच्या डोक्यास जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम सीपीआर आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचे दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले.

याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच निवडणुकीच्या ड्युटीवर असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र शासनातर्फे १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही रक्कम लवकरच देण्याची कार्यवाही प्रशासनाच्या वतीने करण्याची ग्वाही देसाई यांनी चंदनशिवे कुटुंबियांना दिली.

5,798 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश