पन्हाळा (प्रतिनिधी ) : देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात पन्हाळा नगरपरिषदेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलग पाच वेळेस पन्हाळा नगरपरिषदेचा दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत सन्मान होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिली.

पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ पासून आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. पन्हाळा शहरास सलग चौथ्यांदा ३ स्टार मानांकन प्राप्त झाले असून, तसेच ODF++ हा दर्जा सलग चार वेळेस मिळाला आहे. माझी वसुंधरा-२ अभियानामध्ये नगरपरिषदेस पुणे विभागामध्ये प्रथम व राज्यांमध्ये चौथा क्रमांक मिळाला होता. पर्यावरण दिनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरपरिषद गौरवण्यात आले होते. या कामगिरीनिमित्त मुख्याधिकारी विद्या कदम, माजी मुख्याधिकारी स्वरूप खारगे, माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, सर्व माजी नगरसेवक/नगरसेविका, सर्व अधिकारी वर्ग, सर्व सफाई मित्र आणि पन्हाळ्यातील सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

रूपाली धडेल म्हणाल्या, स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये अव्वल क्रमांक सातत्य राखण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी, अधिकारी वर्ग, सर्व सफाई मित्र आणि पन्हाळ्यातील सर्व नागरिकांचे योगदान लाभले. माजी मुख्याधिकारी स्वरूप खारगे म्हणाले, पन्हाळा शहराचा स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी शहरातील नागरिक व नगरपरिषद सफाई मित्र यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सर्व नगरसेवकांनी केलेल्या कामामुळे हा पुरस्कार मिळवण्यात यश मिळाले आहे.