मुंबई (प्रतिनिधी)  : ‘अशोक चव्हाणांची क्लिप आम्ही जाहीर केली, तर त्यांची फार अडचण होईल. ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही. काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात. त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करू इच्छित नाही. चव्हाणांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणार नाही; मात्र त्यांच्या राजकीय बाबींवर आम्ही बोलू शकतो,’ अशा शब्दात भाजप नेते आशीष शेलार यांनी चव्हाण यांना त्यांच्या गौप्यस्फोटावर इशारा दिला आहे.

भाजप नेते आशीष शेलार यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की ‘भाजपासोबत सरकार नको, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातलीच होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना मिळून सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेऊन आले होते. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता,’ असे चव्हाण म्हणाले. यावर शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.