कडगाव (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून पंधरा हजार रुपये द्या यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना आयटक यांच्यावतीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन देण्यात आले. गेली तीन वर्षे बांधकाम कामगारांना व्यवस्थित काम नाही. साहित्य खरेदीचे पाच हजार रुपये मिळत होते, तेही बंद केले आहेत.

विविध योजनांचे अनुदानही कामगारांच्या खात्यावर जमा केली नाही. माध्यान्ह भोजन योजनेचा फारसा फायदा कामगारांना मिळत नाही. त्यामुळे ही योजना बंद करून त्याचे पैसे कामगारांच्या खात्यावर जमा करावेत, कोविड-१९ मध्ये मृत्यू पावलेल्या कामगारास पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, अवजारे खरेदीचे पाच हजार रुपये सुरू करावेत इत्यादी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून पाठपुरावा केला जाईल. विविध लाभांचे अर्ज तपासून मंडळाकडे पाठवले जातील व त्याचे अनुदान लवकर जमा होईल, असे आश्वासन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिले.

यावेळी ज्येष्ठ  कामगार नेते कॉम्रेड दिलीप पवार, आनंदा गुरव, धनाजी गुरव, दिनकर लोहार, प्रदीप पाटील, राजू कांबळे, सदाशिव यादव, शोभा देसाई, जयवंत देसाई, रुक्मिणी जाधव, राजेंद्र देसाई, युवराज गुरव, संजय गुरव, भिकाजी देसाई, रघुनाथ मेने, शिवाजी कुंभार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.