Breaking News

 

 

जाहीर प्रचार संपुष्टात, आता ‘ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसेज..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकारण्यांनी प्रचारामध्ये सर्व माध्यमांचा विशेषत: सोशल माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केल्याचे दिसून आले आहे. आज (रविवार) संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपुष्टात आला. यानंतर सोशल मीडियावरील अॅडमिन लोकांनी ‘कुलूप’ लावल्याने आता दोन दिवसात सोशल मीडियावरील प्रचार फक्त अॅडमिन लोकांच्या हातात असणार आहे. त्यामुळे दोन दिवस सोशल मीडियावरील प्रचाराची सूत्रे ‘अॅडमिन’कडेच असणार आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुकांनी आणि राजकीय पक्षांनी प्रचारासाठी वेगवेगळी तंत्रे वापरून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू केली होती. मागील महिनाभरापासून थेट जनसंपर्क, प्रचारसभा, रॅली, कोपरा सभा, वैयक्तिक भेटीगाठी याशिवाय सोशल मीडियाचा प्रभावी वापर प्रत्येक उमेदवाराने केलेला दिसून येत आहे. सोशल मीडियामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचार करत असताना आपली योग्यता आणि विरोधकांची कमतरता दाखवून देण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले आहेत.  

नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी तर सर्वाधिक सोशल मीडियाचा वापर केला. विशेषतः व्हॉटसअॅपचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडिओ आणि मजकूर व्हॉटसअपवर व्हायरल करून प्रचाराचा ‘धुरळा’ उडवला.

आज सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार बंद झाल्याने सोशल मीडियावरील प्रचाराला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे, पण चाणाक्ष अॅडमिन लोकांनी सायंकाळी पाचपासूनच सर्व व्हॉटसअप ग्रुप ‘ओन्ली एडमिन कॅन सेंड मेसेज’ अशी यंत्रणा कार्यान्वित करून सोशल मीडियाला टाळे ठोकले आहे त्यामुळे दोन दिवसात ज्या नेत्याचे अॅडमिन जास्त त्याच नेत्याला किंवा पक्षाला याचा फायदा होणार आहे. एकंदरीतच दोन दिवस प्रचार यंत्रणेवर अॅडमिन लोकांचेच वर्चस्व असणार हे नक्की…

1,236 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग