नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसऱ्यांदा पीएफआच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत २४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात ४४, कर्नाटकात ७२, आसाममध्ये २०, दिल्लीत ३२, महाराष्ट्रात ४३, गुजरातमध्ये १५, मध्य प्रदेशात २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयवर ही कारवाई सुरु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एनआयएने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर करण्यात आलेलल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. आता याच आधारे राज्यांतील पोलीसांच्या मदतीने पुन्हा एकदा एनआयएने धाडसत्र सुरु केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. राज्यातून औंरगाबादमधून १२ जणांना, सोलापूर १, ठाण्यातून ४ तर कल्याण भिवंडीमधून प्रत्येकी १ संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक केली आहे. पीएफआयचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआयचे सचिव शेख मस्कसूद यांना अटक करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.