कागल (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव यापुढे कायमच तुडुंब भरून राहणार आहे. आपण केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे थेट काळम्मावाडी धरणाचे कालव्यातून आणलेले पाणी ६५ व्या किलोमीटरवर या तलावात मिसळणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव घाटगे तलावाच्या पाणी साठ्याची उंची एकूण २२ फूट आहे. तलावाच्या बाजूने जाणाऱ्या या कालव्याचा तळ हा तलावाच्या तळापेक्षा खाली आहे. पहिल्या ११ फूट उंचीचे पाणी हे कालव्याच्या पाण्याने भरले जाणार आहे.  नंतरच्या म्हणजेच ११ ते २२ फूट या उंचीतील पाणी जलसेतू म्हणजेच सुपर पॅसेजच्या माध्यमातून साठविले जाणार आहे.

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव ही कागल शहराची अस्मिता आहे. कालव्यातून तलावात पाणी जाणाऱ्या ठिकाणी रिटर्न स्टॉप व्हॉल्व बसविलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी कालवा रिकामा असेल, त्यावेळी तलावातील पाणी पाठीमागे परतून कालव्यात येणार नाही.

या बैठकीला जि.प. चे माजी सदस्य युवराज पाटील, नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, उपभियंता प्रशांत कांबळे, शाखा अभियंता अनिल जाधव, कागल नगरपालिकेचे जल अभियंता विजय पाटील हे अधिकारी उपस्थित होते.

कागलच्या जयसिंगराव तलावात उत्तरेकडून वाहणारे दोन मोठे भूमिगत जलस्त्रोत होते. ते कालव्याच्या खुदाईमुळे खंडित झाले होते. या दोनपैकी एक जलस्त्रोत आरसीसी काँक्रिट म्हणजेच सुपर पॅसेज बांधकाम करून प्रवाहित करण्यात आला आहे.  दुसरा जलस्त्रोत लवकरच प्रवाहित केला जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी दिली.