कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे-आकुर्डे येथील धामणी नदीवर पावसाळ्यात पाणी येत असल्याने धामणी खोऱ्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धामणी नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी आकुर्डे ग्रामस्थ व शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

धामणी खोऱ्यामध्ये पावसाळ्यात बंधारे पाण्याखाली जात असल्याने चारीबाजूला पाणी येऊन गावाला बेटाचे स्वरूप येते. पावसाळ्यात विविध समस्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन पूल बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आकुर्डे ग्रामस्थ व शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने सुळे-आकुर्डे धरणावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मोठा पूल मंजूर करून तो त्वरित बांधण्यात यावा, अन्यथा जिल्हा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच गीता पाटील यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासन दरबारी पाठपुरावा, करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पुलासाठी पाठपुरावा करून चार महिन्यांत पुलाचे काम सुरू करण्यासाठी सरकारला भाग पाडू, अन्यथा याच धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, जिल्हा संघटक बाळासो कांबळे, बाबासाहेब फाळके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव, आकुर्डे सरपंच गीता पाटील, अध्यक्ष बनुबाई पाटील, महिला संघटनेच्या उपाध्यक्ष इंदुबाई चौगले, शारदा पाटील, उषा टिक्के, नकुबाई चौगले, संगीता चौगले, विद्या चौगले, सरचिटणीस ए. डी. पाटील, पांडुरंग टिक्के, प्रकाश पाटील, सुभाना वाकरे, शरद पाटील, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.