Breaking News

 

 

कोलंबोवर भीषण दहशतवादी हल्ला : साखळी बॉम्बस्फोटामध्ये १६० जणांचा मृत्यू

कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेची राजधानी कोलंबोवर दहशतवादी हल्ला झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पावणे नऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर ३ बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाले असून यामध्ये १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २८० हून अधिक जण जखमी झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या भीषण हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने देशभरात हाय अलर्टचा इशारा दिला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही देशभरात अति दक्षतेचा इशारा दिला आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटात २८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

या बॉम्बस्फोटाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करत भारतीय उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

678 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash