मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत शिवसेनेला न्यायदेवतेच्या मंदिरात न्याय मिळाला असला तरी आता शिवसेनेला खरी भीती आहे ती वरुणराजाची. त्यामुळे न्यायदेवतेसोबत शिवसेनेवर आता वरुणराजाही प्रसन्न होण्याची गरज असून, त्यांची जर अवकृपा झाल्यास शिवसेनेच्या मेळाव्यावर संकट येण्याची भीतीही शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे.

पोलीस आणि महापालिकेने शिवसेनेला दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याकरिता परवानगी नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी हिरवा दिवा दाखवला. शिवसेनेनेला शिवाजी पार्कवर आपला परंपरागत दसरा मेळावा घेण्यास न्यायदेवतेने परवानगी दिली असली तरी आता सर्वांचे लक्ष आहे ते वरुणराजाकडे. दसरा मेळाव्या आदल्या दिवशी किंवा त्यादिवशी वरुण राजाची अवकृपा झाल्यास त्याचा परिणाम मेळाव्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी पावसामुळे शिवसेनेला आपला दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळे न्यायदेवता प्रसन्न झाली असली तरी वरुणराजा प्रसन्न झाला तरच शिवसेनेचा आवाज शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात घुमलेला दिसेल, अशी चर्चा सुरु आहे.

यंदा शिवसेनेनेतून ४० आमदार, १२ खासदार आणि नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार वाद सुरु असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

यापूर्वी २००६ साली मुसळधार पावसामुळे शिवसेनेला दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. यंदाही पावसाळा थोडासा लांबणीवर पडलेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवातही पावसाचे ढग असेच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची हजेरी जर नवरात्रोत्सवात संततधार होत राहिल्यास आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा त्यादिवशी सकाळी मुसळधार पाऊस कोसळल्यास या दसरा मेळाव्याच्या तयारीवर पाणी फेरले जाऊ शकते.