कोल्हापूर (प्रतिनिधी) : यावर्षी देवस्थान समितीतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. आज या ड्रॉन कॅमेऱ्याचे उदघाटन देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी व देवस्थान कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सध्या एकूण ८० आयपी स्वरूपाचे कॅमेरे व पीटीझेड फिरत्या स्वरूपाचे कॅमेरे कार्यरत आहेत. ड्रोन कॅमेरा वापरासाठी देवस्थानकडील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप व अभिजित पाटील यांनी याबाबतचे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामध्ये आणखी एका फिरत्या कॅमेऱ्याची वाढ झाली आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करण्यात येणार आहे.

नवरात्र उत्सव काळामध्ये सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे गर्दीचा विचार करता सर्व कॅमेरावर नजर ठेवून चोरीचे प्रकार कमी करण्यासाठी एटीएस व पोलीस विभाग यांच्या सूचनेनुसार जादाचे चार कर्मचारी सागर खेडकर, अनिकेत बागल, अभिषेक बागल, अवधूत चौगुले कार्यरत ठेवण्यात आले आहेत.