मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून कायदा व्यवस्थेची हमी घेण्यात आली.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घेणार यावरुन राजकारण चांगलंच तापले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टात आज दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना कुणाची हे अद्याप ठरलेले नाही. अद्याप निकाल आलेला नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आज मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली.
शिंदे गटाच्या वतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका आमदार सदा सरवणकर यांनी केली होती; पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दणका बसला. पालिकेने कायद्यानुसार निर्णय घेतलेला नाही, असे सांगत कोर्टाने पालिकेलाही फटकारले आहे. ठाकरे गटाच्या वतीने आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. आता शिवसेनेचे पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. शिवसेनेच्या वतीने पहिला अर्ज करण्यत आला होता; पण कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पालिकेने परवानगी नाकारली. २०१६ मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिली आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला.