Breaking News

 

 

एन. डी. तिवारींच्या मुलाची हत्याच ! : शवविच्छेदन अहवालाने खळबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत राजकीय नेते नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित याच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. रोहितचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला रोहितचा मृत्यू मेंदूतील रक्तस्त्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. 

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रोहित राहात असलेल्या दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घराची झडती घेतली. या पथकात फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश होता. मात्र माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. कोणताही ठोस पुरावा हाती लागेपर्यंत काहीही सांगण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली. मात्र, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा गूढरित्या मृत्यू झाला होता. रोहितच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. रोहितला घरातील नोकरांनी सर्वप्रथम मृतावस्थेत पाहिले होते. त्या वेळी रोहितच्या नाकातून रक्त बाहेर आले होते. त्यामुळे सुरुवातीला रोहितचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. रोहितची आई उज्ज्वला तिवारी यांनी मात्र रोहितचा मृत्यू सामान्य असल्याचा दावा केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *