Breaking News

 

 

‘चांगभलं’च्या जयघोषात अन् अपूर्व उत्साहात, भक्तिभावात जोतिबा यात्रा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून तीन दिवसांपासून चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा यात्रा आज (शुक्रवार) अपूर्व उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. कडक उन्हाळा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे सावट या वर्षी जोतिबा यात्रेवर पडल्याचे जाणवले. दरवर्षीपेक्षा तुलनेने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी होती.

श्री जोतिबा मूर्तीवर पहाटे प्रथम अभिषेक आणि पूजा पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाली. दुपारी मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. निनाम पाडळी, विहे, कसबे डिग्रज या गावांच्या मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे हस्ते झाले. या वेळी आ. सतेज पाटील, आ. सत्यजित पाटील, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने जोतिबा डोंगर गर्दीने फुलून गेला होता. परंपरेप्रमाणे पहाटे शासकीय अभिषेक व पूजा करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत आणि गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. दुपारी सव्वाबारा वाजता मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. आचारसंहिता असल्याने पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींऐवजी वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत उपस्थित सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. ज्योतिबा मंदिर ते यमाई मंदिर मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी जोतिबाची पालखी यमाईदेवीच्या भेटीस निघाली. पालखीसोबत भालदार, चोपदार आदी मानकरी आणि उंट, घोडे, हत्ती असा लवाजमा होता. पालखी मार्गावर दुतर्फा उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले आणि गुलाल, खोबऱ्यांची उधळण केली. यानंतर भाविक परतीच्या मार्गी लागले. यात्रेनिमित्त करवीरकरांनी भाविकांच्या सेवेसाठी पाणी, सरबत, चहा, नाश्ता, महाप्रसाद, वाहनांची देखभाल दुरुस्ती, आरोग्य सेवा मोफत पुरवली होती.

495 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा