Breaking News

 

 

राजू शेट्टी विचारगंगा नव्हे, गटारगंगा ! : सदाभाऊ खोत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रथम भ्रष्ट साखर कारखानदारांच्या व नेत्याच्या विरोधात होती. हे भ्रष्ट नेते शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत, असे राजू शेट्टी म्हणत होते. पण ज्याचे नाव घेऊन ते मोठे झाले त्यांचेच फोटो छापून ते आता आपल्यासाठी मते मागत आहेत. स्वच्छ चारित्र्याचा खासदार म्हणवून घेणारे आता अजित पवार, अशोक चव्हाण, शरद पवार यांचे फोटो कसे लावतात. यावरुन राजू शेट्टी म्हणजे विचारगंगा नसून ती गटारगंगा आहे आणि ती गटारगंगेलाच जावून मिळाली आहे. अशी टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत केली.

सदाभाऊ खोत म्हणाले, बहुजनांवर ज्यांनी प्रहार केले, शेतकऱ्यांवर वार केले, गुन्हे दाखल करुन तुरुंगात डांबले त्यांच्याबरोबरच राजू शेट्टी आहेत. म्हणूनच त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहोत. एक नोट एक वोट म्हणत ते एका डब्यात ७५ लाख जमल्याचे सांगतात. तो डबा किती मोठा असेल, हे लक्षात घ्या. एक काळ असा होता, यांच्यासाठी स्वतःहून माणसे येत होती, आता ते आणावी लागतात आणि काँग्रेसवाली ती आणत असल्याचा टोला सदाभाऊंनी लगावला.

तसेच विकासराव देशमुख यांच्यासाठी आता ते चौकशी समितीचा फार्स करतील. पण त्यांच्यासाठी गेला तो गद्दार आहे, आणि स्वतः मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीत जाऊन सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यांनी राजकारण सोडलेले नाही. चळवळ सोडून तुम्ही जिथे गेलात, ती योग्य आहे का, असे विचारले असता आम्ही जिथे आहोत, तिथे योग्यच आहोत. चुकीचे काही वाटल्यास पुन्हा विचार करु, असे सांगितले. शेतकऱ्यांना अजून एफआरपी मिळाली नाही, दुधाला अनुदान मिळाले नाही याकडे लक्ष वेधले असता त्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी मिळाली असून यावर्षीचा गळीत हंगाम सुरु असल्याचे मोघम उत्तर दिले.

आपण केवळ राजू शेट्टी यांना पाडण्यासाठीच प्रचार करीत आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, हातकणंगलेतील मतदार संघाचे पालकत्व माझ्याकडे आहे. मी या मतदार संघातील मतदार आहे. त्यामुळे याठिकाणी जास्त लक्ष असून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे, माढा याठिकाणी जावून आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

948 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे