Breaking News

 

 

लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी मतदानास प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला झालेल्या मतदानात २० राज्यांच्या ९१ जागांवर मतदान झाले होते. आज (गुरुवार) दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात झाली आहे. १२ राज्यातील ९५ जागांसाठी मतदान सुरू असून यामध्ये माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, द्रमुक नेता दयानिधी मारन, ए. राजा, कनिमोळी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, भाजपाच्या हेमामालिनी, बसपाचे दानिश अली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांसारखे दिग्गज रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील १० मतदारसंघात आज सकाळी ११ पर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या दहा मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कन्या आ. प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सोलापूर आणि पंढरपूर येथे मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे मतदान काही काळासाठी थांबवण्यात आले होते. सोलापुरात पुन्हा मतदानास सुरुवात झाली आहे.  आज सकाळी ११ पर्यंत सोलापूर – १९, हिंगोली – २०.४०, अकोला – १६.९५, बुलडाणा – २०.५२, बीड – १८.३९, नांदेड – २४.०६ परभणी – २०.६२, लातूर – २०, उस्मानाबाद-२०.०९ तर अमरावती मतदारसंघात १७.७२ टक्के मतदान झाले आहे.

१९ मार्चला जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार दुसऱ्या टप्प्यात १९ मार्चला १३ राज्यांतील ९७ जागांवर मतदान होणार होते. पण त्रिपुरा आणि तामिळनाडुच्या वेल्लोर या जागांवर मतदान स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे १२ राज्यांच्या ९५ जागांवर मतदान होईल. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक होत आहे. मतमोजणी २३ मे ला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash