नागपूर (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान, आता संघाच्या वार्षिक दसरा सोहळ्यात गिर्यारोहक संतोष यादव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आरएसएसने जाहीर केले आहे.

संतोष यादव या मूळच्या हरियाणाच्या आहेच. त्या एक प्रतिभावान गिर्यारोहक आहेत. शिवाय ‘माऊंट एव्हरेस्ट’ दोनदा सर करणारी त्या पहिल्या महिला आहेत. सन २००० मध्ये संतोष यादव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा ही पुरुषांची संघटना अशी आहे. या प्रतिमेमुळे अनेक राजकीय पक्षांकडून संघावर टीकादेखील केली जाते. कुटुंब आणि समाजातील मूल्यांचा प्रसार करणे हा संघाच्या कुटुंब प्रबोधन कार्यक्रमाचा उद्देश आहे. १९३६ पासून संघाची ‘राष्ट्र सेविका समिती’ नावाची शाखा असली, तरी त्यात महिला मुख्य गतिविधींचा भाग नाहीत. त्यामुळे संघाची ओळख, पुरुषांची संघटना म्हणून केली जाते. महिला मतदारांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी संघाने उचललेले हे पाऊल असल्याची सध्या चर्चा आहे.