मुंबई/ पुणे (प्रतिनिधी) : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके, महाराष्ट्राला धोके’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलकांनी आरोप केला की, राज्यातील १ लाख ५८ हजार कोटींचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. याच्याविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. वेंदात-फॉक्सकॉन प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे होणार, हे जवळपास ठरले होते. गुजरातपेक्षा चांगले वातावरण महाराष्ट्रात असताना राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेला. अशा पद्धतीचे आंदोलन राज्यभरात ठिकठिकाणी सुरु असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन सुरु आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे दिले आश्वासन दिले आहे. “पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन सुरु आहे.

‘महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप,’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत. वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता; परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.