मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही गुजरातेतील भरूचमध्ये जाणार आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

रायगडमध्ये बल्ब ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता; मात्र केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत गैरसमज सरकारकडून पसरवला जात आहे. आम्हालाही यासंबंधीत माहिती सोशल माध्यमातून समजत आहे. फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत वेगळा एमओयूची सांगड घालून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्रात फाॅक्सकाॅनसोबतचा एमओयू अ‌ॅपलच्या आयफोनच्या ‌अ‌ॅसम्ब्लीबद्दल होता.

आदित्य म्हणाले, गुजरातला गेलेल्या प्रकल्प स्पष्टपणे सेमीकंडक्टरशी संबंधित होता. केंद्राने यावर ७६ हजार कोटींची सबसीडी दिली होती. आम्ही जानेवारीत अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली होती आणि पाठपुरावा केला. डावोसमध्येही एमओयू करायचा होता, कागदपत्रे तयार होती. केंद्र-राज्य सरकारच्या सबसीडीसह वेदांता आणि फाॅक्सकाॅनच्या गुंतवणुकीची सांगड घालणे आवश्यक होते. त्यानंतर जूनमध्ये आम्ही भेटही घेतली; पण चाळीस गद्दारांनी आपले सरकार पाडले. त्यानंतर हा विषय मागे राहिला.

आदित्य ठाकरे म्हणाले, हे सर्व जे चालले आहे त्यात महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाणारा आहे. एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख केला. एवढ्या मोठ्या उद्योगाचा एकेरी उल्लेख योग्य नाही. दोन लाख कोटींच्या प्रस्तावाला चार लाख कोटींचा म्हणत असतील तर असे उद्योग हातातून जातील.