कुंभोज (प्रतिनिधी)  : हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष, कुंभोज ग्रा.पं. सदस्य अजित देवमोरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक रद्द करावे, या मागणीचे निवेदन दिले आहे.

पिवळे व केशरी रेशनकार्डचा लाभ घेणारे सरकारी कर्मचारी, करदाते, खासगी नोकरदार, घरात चारचाकी वाहन व तत्सम सुविधा असणारे, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी कुटुंबे शोधून त्यांना पांढऱ्या शिधापत्रिका देण्यात येणार असा प्रशासन व सरकारने काढलेला आदेश हास्यास्पद आहे. ‘रेशनच्या अनुदानातून बाहेर पडा’ अशी योजना १९ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयाच्या आधारे राबवित आहे. त्यामध्ये लोकांकडून फॉर्म भरून घेऊन आम्ही स्वेच्छेने सबसिडी सोडत आहोत, असे लिहून घेतले जात असताना आता शासन आम्ही घरोघरी सर्वेक्षण करून दोषींवर कारवाई करू व आतापर्यंत घेतलेल्या धान्याचे पैसेही वसूल करू, अशा प्रकारे काढलेले आदेश अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अन्न सुरक्षा लाभ देताना २००१ च्या अंत्योदय कार्डवर सरसकट २०१३ ला अंत्योदय योजना लागू केली. आज ८ वर्षानंतर यांचे आर्थिकस्तर वाढविण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न जाहीर करावे. रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक येत्या १५ दिवसात रद्द करण्यात यावे, अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष अजित देवमोरे यांनी दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात मोहसीन सुतार, आकाश पाटील, त्रिगुण पांडव आदी उपस्थित होते.