कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत सदैव सोबत आहे. लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोकुळमार्फत मोफत लसीकरण सुरु आहे. संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले असल्याचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. तसेच दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी, एलएसएस आणि कृत्रिम रेतन सेवकांच्यामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले.

विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळच्या पशुवैद्यकीय केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना, उपचाराच्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. हातकणंगले तालुका आणि इचलकरंजी परिसर वगळता जिल्ह्यात लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव कमी आहे. गोकुळ दूध संघाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या गावात लम्पीस्कीनने बाधित जनावरे आढळली तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या  संघाच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून संबंधित जनावरांवरती आवश्यक उपचार करावेत. लम्पीस्कीनविषयी उत्पादकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी.

तसेच, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी करुन गोठ्यांची साफसफाई, स्वच्छता करावी. बाधित जनावरे असतील तर तात्काळ संघाकडे संपर्क साधावा.  संघातर्फे सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन विश्वास पाटील यांनी दुध उत्पादकांना केले.