कोल्हापूर (प्रतिनिधी) : नेत्रदान चळवळीला बळ मिळणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. नेत्र जनजागृती पंधरवडा निमित्त ‘सक्षम’ (समदृष्टी, क्षमता विकास तथा अनुसंधान मंडल) शाखा कोल्हापूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद नेत्र रुग्णालयाचे डॉ. चेतन खारकांडे होते.

न्या. पाटील म्हणाले, नेत्रदान जनजागृती गरजेची आहे. आपल्या देशात अनेकजण डोळे मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. तुलनेने प्रत्यक्ष नेत्रदात्यांची संख्या कमी आहे, त्याबाबत सर्व स्तरावर सतत जागृती झाली पाहिजे. यासंदर्भातील जनजागृती चळवळीसाठी न्यायालयातील विधी सेवा विभाग मदत करण्यास तत्पर आहे.

‘सक्षम’ चे डॉ. चेतन खारकांडे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी सद्यस्थिती तसेच समज आणि गैरसमज याची नेमकेपणाने माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनेलवरील वकिलांनी नेत्ररोपण शस्त्रक्रिया कशी केली जाते, नेत्रदान कोण करू शकतो, कोणाचे डोळे गरजू रुग्णांना चालतात, नेत्रदात्याच्या नातेवाइकांची या चळवळीतील भूमिका या विषयी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन केले.

सक्षम संस्थेचे सचिव ॲड. अमोघ भागवत यांनी प्रास्ताविक केले. सहायक अधीक्षक राजीव माने आभार यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. सी. चांडक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सक्षमचे गिरीश करडे आणि न्यायालयातील वकील, कर्मचारी उपस्थित होते.