Breaking News

 

 

प्रभाग समिती सभापतीपदी कांबळे, फरास, कवाळे, शेळके यांची निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या चारही विभागीय प्रभाग समितीच्या सभापतींची निवड आज (सोमवार) विशेष बैठकीत करण्यात आली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल अध्यक्षस्थानी होते.  

गांधी मैदान प्रभाग समिती, छ. शिवाजी मार्केट प्रभाग समिती, राजारामपुरी प्रभाग समिती आणि ताराराणी मार्केट प्रभाग समितीच्या सभापतींच्या निवडी आज महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात करण्यात आल्या. सकाळी अकरा वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. सभापतीपदी अनुक्रमे सौ.रिना बंडू कांबळे, सौ.हसिना बाबू फरास, शोभा कवाळे, राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली.

गांधी मैदान प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.रिना बंडू कांबळे व नगरसेवक विजयसिंह पांडूरंग खाडे- पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यांचे अर्ज वैध ठरले. माघारीच्या काळात दोघांनीही अर्ज मागे घेतला नाही. यासाठी हातवर करुन मतदान घेण्यात आले. सौ.रिना कांबळे यांना ११ मते तर विजयसिंह खाडे-पाटील यांना ६ मते मिळाली. निवडीवेळी नगरसेविका सौ.तेजस्विनी इंगवले, सौ.मेघा पाटील व सौ.प्रतिक्षा पाटील हया गैरहजर होत्या.

छ.शिवाजी मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.सुनंदा सुनिल मोहिते व सौ.हसीना बाबू फरास यांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये दोन्ही अर्ज वैध ठरले. मात्र सौ.सुनंदा मोहिते यांनी माघार घेतल्याने सौ.हसीना फरास यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीवेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव हे गैरहजर होते.

बागल मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका शोभा धनाजी कवाळे व सौ.सविता शशिकांत भालकर यांचे अर्ज दाखल झाले होते. हे दोन्ही अर्ज वैध ठरले. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही. यावेळी हातवर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये शोभा कवाळे यांना ११ मते तर सौ.सविता भालकर यांना ८ मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका सौ.शमा मुल्ला हया गैरहजर होत्या.

ताराराणी मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेवक श्रावण संभाजी फडतारे व राजसिंह भगवानराव शेळके यांचे अर्ज दाखल झाले होते. दोन्ही अर्ज वैध ठरले. विहीत वेळेत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे हातवर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये श्रावण फडतारे यांना १० मते तर राजसिंह शेळके यांना १० मते पडली. दोघांना समान मते मिळाल्याने सभा अध्यक्षांनी चिठ्ठी पध्दतीने सभापती निवड केली. त्यात राजसिंह शेळके यांनी बाजी मारली. सलग तिसऱ्यांदा सभापतीपदी निवड होवून त्यांची हॅटट्रीक झाली आहे. ही चिठ्ठी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थी कु.दिव्या संतोष कांबळे हिने काढली.

यावेळी महापौर सौ.सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसचिव दिवाकर कारंडे, विजय वणकुद्रे, सचिन जाधव, नगरसेवक, नगरसेविका यांनी नुतन प्रभाग समिती सभापतींचे रोप देवून अभिनंदन केले.

498 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा