कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागामध्ये बी.एस्सी.- एम.एस्सी. नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी (५ वर्षांचा एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी विशाल पांडुरंग भांदिगरे (रा. पुंगाव, जि. कोल्हापूर) आणि अनुषा सुरेश अगसिबागिल (रा. कोल्हापूर) यांची संशोधन आणि विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

तसेच तेजश्री राजेंद्र जाधव (रा. आंधळी, सांगली) आणि आकांक्षा अमरनाथ करंबळी (मिरज) यांची फौंड्री उद्योगातील सेराफ्लक्स इंडिया कोल्हापूर व स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभाग यांच्या सहयोगी शोध प्रकल्पांतर्गत एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.