Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – पोलिसांचा मिंधेपणा नडला…

यादवनगर पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा घालण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याने पोलिसांची प्रतिमा काळवंडली आहे. त्याचे कारणही पोलीसच आहेत. अशा प्रकारे हल्ला होण्याची कोल्हापुरातील पहिलीच घटना आहे. दोन नंबरचा धंदा करणाऱ्यांची एवढी मजल पोहोचली. त्याचे खरे कारण पोलिसांचा मिंधेपणा होय.

पोलिसांचा मिंधेपणा असेच नडला असेच म्हणावे लागेल. हजार- पाचशे रुपयांसाठी अशा गुंडा-पुंडांच्या मिंध्यात राहणारे अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी आहेत. कसलाही दाखला आणायला, पासपोर्टच्या कामासाठी पोलीस ठाण्यात गेले की, चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पोलीस ठाण्यात काय चालते, हे वरिष्ठांना माहीत  नसते असे म्हणणे चुकीचे ठरेल. जमा झालेला पैसा कुठपर्यंत जातो, हे उघड सत्य आहे. हजार – पाचशे रुपयांसाठी स्वतःचा, पदाचा व खाकी वर्दीचा स्वाभिमान गहाण टाकला जातो. मिंधेपणात राहण्याची सवय लागली आहे.

यादवनगर पांजरपोळमधील दोन नंबरचा धंदा करणाऱ्यांच्या मागे येथील सर्वसामान्य लोक कसे उभे राहतात? यालाही पोलीसच जबाबदार आहेत. पोलिसांच्या विरोधातील प्रचंड राग हेच प्रमुख कारण आहे. येथील लोकांनाही या गुंडांनी सटर-फटर कारणासाठी मिंधे करून ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली तर, आपले काय होणार या भीतीपोटीच लोक त्यांच्या मागे जातात. कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांनाच लोक घाबरत नाहीत. उलट, त्यांच्यावर हल्ला करतात हे नामुष्कीजनक आहे. कोल्हापूरचा बिहार झाला आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे. गुंडांच्या मिंध्यात राहण्याच्या सवयीमुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे. पोलीस सज्जनांचे नाही तर, दुर्जनांचे मित्र झाले आहेत, हे कटू वास्तव आहे.  

सलीम मुल्ला आणि त्याची टोळी फार मोठी नाही, पण त्यांच्यातील धाडस वाढले आहे. पूर्वी याच सलीमला एकटा पोलीस भारी ठरत होता. नैतिकता असणाऱ्या पोलिसांसमोर असे लोक गुडघे टेकतात, असा अनुभव आहे. सध्या मिंधे असलेल्या पोलिसांना कोणी विचारत नाही. एकटा पोलीस निश्चित कमी पडेल, पण कायद्याचे पाठबळ असताना कमी पडण्याचे काहीच कारण नाही, अशा गुंडा- पुंडांना काही राजकीय घटकांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. अशांची फिकीर न करता त्यांचेही कंबरडे मोडायला हवे. त्यांना सहकार्य करणाऱ्या नातेवाईक, मित्रांवरही कठोर कारवाई व्हायला हवी.

पोलिसांची पूर्वीप्रमाणे प्रतिमा निर्माण व्हायची असेल तर, मिंधेपणाची सवय सोडून स्वाभिमानाने जगण्याची, वागण्याची सवय लावून घ्यायला हवी. अन्यथा टिनपाटांकडून मार खाण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही.

-ठसकेबाज

1,374 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग