Breaking News

 

 

धामणी प्रकल्पग्रस्त मतदानाच्या बहिष्कारावर ठाम…

कळे (प्रतिनिधी) :  तीन तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्पाचे काम गेले २० वर्षे रखडले आहे. याच्या निषेधार्थ भागातील ३० हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. प्रशासन आता जागे झाले असून जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांनी धामणीखोरा  समितीच्या सदस्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली.

या बैठकीत मतदानावरील बहिष्कार मागे घ्या, ऑक्टोबरपासून काम चालू करू, असे सांगितले. पण धामणीखोरा समितीच्या लोकांनी साफ नकार देऊन आगोदर कामाला सुरुवात करा मगच बहिष्कार मागे घेतो असे सांगितले. तर  स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती बघावी असे सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही तशी तयारी दर्शवली. त्यानुसार मासुर्ली येथे धामणीखोरा समितीचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पाटबंधारे विभागाचे एस.आर. पाटील व इतर प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहून संवाद साधला. 

यानंतर सुरू झालेल्या बैठकीत  सर्वप्रथम विविध पदाधिकारी, शेतकरी,   कार्यकर्त्यांनी आपली धामणीप्रकल्पा विषयीची अडचणींची माहिती दिली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी धामणी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमिन मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. ऑक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सरकार  प्रशासन व शेतकरी यातील दुवा साधत  धामणी खोऱ्यातील लोकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात यावा, अशी विनंती केली. तसेच आम्ही ऑक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगत लेखी देण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतरही धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी बहिष्कारावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणताही सत्कार न स्विकारता परतले. यावेळी धामणीखोऱ्यातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2,061 total views, 6 views today

One thought on “धामणी प्रकल्पग्रस्त मतदानाच्या बहिष्कारावर ठाम…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग