Breaking News

 

 

‘मोदीसाहेब, हे वागणं बरं नव्हं…’

बीड (प्रतिनिधी) : माझ्या घराची चिंता मोदींना आहे. आम्ही सगळे भावंडं जिवाभावाने वागतो. एकमेकांना साथ करतो. मोदींना घरादाराचं काय माहिती ? हा एकटा गडी, मोदीसाहेब हे वागणे बरं नव्हं, नको तिथं तोंड घालू नका, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ते आज (रविवार) बीड येथे महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

गोपीनाथ मुंडे हे माझे सहकारी होते. मी विधिमंडळात नेता होतो, त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे अनेकदा आमच्यात संघर्ष होत होता. मात्र, वैयक्तिक पातळीवर कधीही टीक टीपण्णी केली नाही. त्यामुळेच, मुंडेंच्या मृत्यूनंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेतला. जर, पोटनिवडणूक लागली अन् मुंडेंच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला. तर, आम्ही उमेदवार देणार नाही. त्यानुसार, आम्ही मागील निवडणुकीत उमेदवार दिला नाही. तर, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडेही त्याच जोमाने काम करत आहेत. मुंडेंची राजकीय परंपरा धनंजय मुंडे जोपासत असल्याचंही पवार यांनी म्हटलं. 

मोदी माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. पण, मी दिल्लीत भेटल्यावर मोदींना बोलणार आहे. मोदीसाहेब हे वागणं बरं नव्हं,  असं त्यांना पार्लमेंटमध्ये भेटल्यावर सांगणार असल्याचंही पवार यांनी बीडमधील सभेत म्हटलं. ते आपल्या सभेत नेहरु आणि गांधी कुटुंबावर टीका करतात. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु होते, बांग्लादेशची फाळणी करून इंदिरा गांधींनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली. राजीव गांधीनी विज्ञानाचा आदर करुन लोकांच जीवन सोपं कसं करता येईल, हे पाहिलं. पतीच्या हत्येनंतरही सोनिया गांधी देशात राहिल्या. देशाची धुरा त्यांनी सांभाळली. तर आज त्यांचा पुत्र तरुणांचे संघटन करत आहे. तरीही, हे मोदी म्हणतात काँग्रेसने 70 वर्षात काय केलं?, असे म्हणत पवारांनी मोदींना लक्ष्य केलं.

1,158 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग