कागल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुरुकली येथील पांडुरंग लक्ष्मण डवरी यांच्या कुटुंबीयांनी अवघड शस्त्रक्रियेसाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी मदत केल्याबद्दल त्यांचा तुळशीहार घालून सत्कार केला. येथील छत्रपती शिवाजी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी आल्यावर रुग्णसेवेबद्दल झालेल्या कृतज्ञतापर सत्काराने आमदार मुश्रीफ भावनिक झाले.

पांडुरंग लक्ष्मण डवरी (वय ३५) यांच्यावर हृदयाच्या झडपेची अत्यंत अवघड व किचकट शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मुख्य अडथळा होता तो ऑक्सिलेटरच्या तुटवड्याचा. कारण रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे ऑक्सिलेटरची आयात पूर्णतः बंद झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर यांनी आ. मुश्रीफ यांच्या लक्षात ही समस्या आणून दिली. मुश्रीफ यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे हृदय शल्य चिकित्सक डॉ. किशोर देवरे यांना दूरध्वनीवरून वस्तुस्थिती सांगितली. डॉ. देवरे यांनी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यामधून हे विशेष ऑक्सिलेटर उपलब्ध केल्यानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

पांडुरंग यांच्या आई शांताबाई, पत्नी ज्योती, भाऊ सागर आदी कुटुंबीयांनी आमदार मुश्रीफ यांचे ऋण व्यक्त केले. शांताबाई म्हणाल्या, ‘साहेब….., माझ्या पोराला जीवनदान दिले. हे उपकार कसे फेडू? अशा हजारोंना यमाच्या दारातून परत आणणारा तूच आमचा विठ्ठल आहेस,’ असे म्हणताच आ. मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.