कोल्हापूर (प्रतिनिधी) : केडीसीसी बँक शेतीसह कारखानदारीमध्ये साखर कारखाने व सूत गिरण्या या मोठ्या उद्योगांना अर्थ पुरवठा करीत आहे. या पारंपरिक कर्ज पुरवठ्याबरोबरच बँकेने मध्यम व लघु उद्योगांनाही भरीव अर्थपुरवठा करण्याची धोरण स्वीकारल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिरोळच्या पद्मजा पॅकेजिंग या उद्योगाला ३७ कोटी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. मुश्रीफ यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुंजीर, संचालक हेमंत देसाई, संचालक अमर देसाई यांनी ते स्वीकारले. कंपनीमध्ये मोठ्या आकारातील कोरोगेटेड बोर्ड, बॉक्स, कार्टून, घडीचे बॉक्स यांचे उत्पादन केले जाते. दररोज १२० टन उत्पादनक्षमता असलेल्या या उद्योगातून देशासह परदेशातही निर्यात केली जाते.

मुश्रीफ म्हणाले, अलीकडेच नागरी बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्याच्या ५० टक्के कर्ज २५ लाखपर्यंत देण्याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. स्टार्टअप सारखे प्रकल्प जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत. त्यांनाही वाजवी दरात बँकेने पुरेसे व वेळेत अर्थसहाय्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

उद्योग व कारखाने चांगले चालत असताना व बँक पातळीवर चांगली पत, क्षमता असतानाही त्यांना वाजवी व्याजदरात पुरेसा व वेळेत कर्ज पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच केडीसीसी बँक शेतीसह साखर कारखानदारी, सूत गिरण्या व आता औद्योगिक कर्जपुरवठ्यातही उतरत आहे. निर्यातक्षम उद्योग, परदेशी शिक्षण, स्वयंरोजगार, शासन अनुदानाच्या योजना अशा अनेक योजनातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट व संस्थामार्फत अर्थसाह्य दिले जात आहे.

यावेळी आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भय्या माने,  रणवीरसिंग गायकवाड,  स्मिता गवळी, संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. बिगर शेती कर्जे व लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, अकाउंट बँकिंग विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत रावण, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर आदी अधिकारी उपस्थित होते.