Breaking News

 

 

गोकुळ बळकावण्याचा डाव खेळणाऱ्या महाडिकांना हद्दपार करा : विजयसिंह मोरे

गारगोटी (प्रतिनिधी) : देशात अव्वल असणारा गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करू नका ही गोकुळच्या संचालकांची  मागणी धुडकावून लावत महाडिक यांनी संघावर मालकी मिळविण्यासाठी संघ मल्टीस्टेट  करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली  जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी संघटितपणे महाडिकांना कुटील डाव हाणून पाडला आहे. लोकसभा  निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करून महाडिकांना आता जिल्ह्यातून हद्दपार करूया, असे आवाहन ‘बिद्री’चे संचालक विजयसिंह मोरे  व भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी केला.

‘टीम सतेज नावाने आमचं ठरलयं या बॅनरखाली  आज (शनिवार) राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील आ.सतेज पाटील समर्थकांचा प्रा. मंडलिक यांच्या समर्थनार्थ भव्य मेळावा आदमापूर येथे पार पडला. बिद्रीचे संचालक विजयसिंह मोरे, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले,  शामराव देसाई, भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती सचिनराव घोरपडे यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते.

या वेळी संचालक मोरे म्हणाले की, स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला दावणीला बांधणाऱ्या आणि स्वार्थी घराणेशाही जपणाऱ्या अघोरी महत्त्वाकांक्षेच्या महाडिक कुटुंबियांचा या निवडणुकीत काटा काढण्याची आलेली संधी कार्यकर्त्यांनी दवडू नये. ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आम्ही त्यांना खासदार केले. पण विधानसभेत त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. या कृतघ्न  खासदाराला धडा शिकवण्याच्या निर्धाराने टीम सतेज कामाला लागली आहे. सर्वांना फसविण्याचा धंदा करणाऱ्या या प्रवृत्तीला जिल्ह्यातून हद्दपार करूया.

भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती सचिन घोरपडे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वीच सतेज पाटील यांनी मंडलिक यांची उमेदवारी घोषित केली होती. सतेज पाटील जे ठरवतात ते करून दाखवतातच. जिल्ह्यात सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी प्रा. मंडलिक यांना खासदार करायचे आहे. तीच त्यांना वाढदिवसाची भेट आहे.

भारती पवार, अभिषेक शिंपी यांचीही भाषणे झाली. प्रा. संजय मंडलिक म्हणाले की, काही वर्षापासून सतेज पाटील आणि आम्ही एकत्र काम करत आहोत. महाडिक यांच्या रूपाने जिल्ह्यात वाढत असलेली दुष्ट प्रवृत्ती घालवणे आणि जिल्ह्याचे राजकीय शुद्धीकरण करणे हे उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढवत आहेत. दोन नंबर व्यवसायातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या महाडिकांच्या एकाधिकारशाहीला संपवायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची आहे. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत माझ्यासाठी जागरूकपणे काम करा. या वेळी पांडूरंग पाटील (कासारकर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रा. मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला.

मेळाव्यास  माजी जि. प. सदस्य एस. एम. पाटील, बिद्रीचे माजी संचालक प्रकाशराव देसाई, माजी सरपंच बाळासाहेब बुवा, बाबासाहेब देसाई, सरपंच शंकरराव गुरव, लहू कुरडकर, वाघापूरचे सरपंच दिलीप कुरडे, उपसरपंच बाजीराव जठार, राजू काझी, बचाराम पाटील, एम.डी. खडके ( लाडवाडी ) , वैभव तहसिलदार, डॉक्टर सुभाष पाटील,  मधुकर वरूटे, पं. स. सदस्य आर. के. मोरे, बिद्रीचे माजी संचालक बी.एस. पाटील, जीवन पाडळकर, आजऱ्याचे नगरसेवक किरण कांबळे, नगरसेवक अमित खेडेकर, आजरा कारखान्याचे माजी संचालक आनंदराव कुंभार, यांच्यासह कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक यांनी केले.

2,511 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *