नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरातून निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देशातील ४६ सर्वोत्तम शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील.

महाराष्ट्रातून शशिकांत संभाजीराव कुलथे, सोमनाथ वामन वाळके आणि कविता संघवी या तीन शिक्षकांची निवड झाली आहे. याशिवाय पंजाब, तेलंगणा या दोन राज्यातूनही तीन-तीन  शिक्षकांची, तर इतर राज्यातून एक वा दोन शिक्षकांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कर झाला आहे.

देशातील विविध राज्यांमधून या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ऑनलाईन निवड प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. या शिक्षकांनी आपल्या वचनबद्धतेने आणि चिकाटीने शालेय शिक्षणाचा दर्जा तर सुधारलाच, पण विद्यार्थ्यांना पात्रही केले आहे.