Breaking News

 

 

…तर वाराणसीमध्ये होणार लक्षवेधी लढत !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविरुद्ध प्रियांका गांधी यांना उतरविण्याचा विचार काँग्रेसमध्ये पुढे आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस भाजपला धक्का देण्याचा विचार करत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाले आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात, या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते. 

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की मोदींना घेरण्यासाठी काँग्रेस वाराणसी जागेतून त्यांना उमेदवारी देईल. 

2014च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून निवडणूक लढविलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांचा मोदींनी १ लाखहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यामुळेच काँग्रेस यंदा प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

609 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग