Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – कमालीच्या द्वेषाची निवडणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील या वेळेची लोकसभेची निवडणूक कमालीच्या द्वेषाची निवडणूक म्हणून कायम स्मरणात राहणार आहे. या राजकारणातून जिल्ह्याच्या पदरात काहीच पडणार नाही, हे सर्वज्ञात आहे. विकासाच्या कामाबरोबरच प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक कशी होणार हाही प्रश्नच आहे.

कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून परिचित आहे. पण, कोणाची तरी जिरवायची या महत्त्वाकांक्षी भूमिकेतून जिल्ह्यात द्वेषाच्या  राजकारणाची बीजे अंकुरली आहेत. ‘शेजारच्या घरात ढेकणे  झाली, म्हणून स्वतःचं घर जाळण्यातला’ हा प्रकार आहे. यश-अपयश हा नशिबाचा भाग असतो.

कमालीचा द्वेषा आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेतून काहीजण या निवडणुकीकडे पाहात आहेत. स्वतःचे नुकसान होण्याबरोबरच स्वपक्षालाही अडचणीत आणण्याचे काम होत आहे. खरोखरच एखाद्यामुळे आपण अडचणीत येत असू तर त्याचा न्यायनिवाडा स्वतः नव्हे, तर नियतीच करत असते. नियतीचा कायदा हातात घेणे हे किती योग्य आहे, हे येणारा काळच सांगणार आहे.

द्वेष भावनेमुळेच ‘महाभारत’ घडले. पांडवांबद्दल असलेल्या प्रचंड द्वेषाने दुर्योधन पछाडला होता. त्यामुळे अखेर त्याची धूळदाण उडाली. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद लक्षात ठेवण्याची गरज आहे. पक्षशिस्तीला खूप महत्त्व असते. पक्षात एकवाक्यता, एक सूर राखत एकदिलाने काम करावे लागते. कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा परिणाम पक्षाच्या शिस्तीवर होता कामा नये. सामुदायिक निर्णय मनाला पटला नाही तरी, त्याच मार्गाने जाणे योग्य ठरते. पक्षाची रचनाही ठरलेली असते. पक्ष कोणा एकाच्या मालकीचा नसतो. अलीकडे मात्र, ‘मी म्हणजे पक्ष’ अशी भावना रुजली आहे. त्यामुळेच पक्षालाच धाब्यावर बसवून स्वतःच्या महत्त्वाकांक्षेनुसार काम केले जात आहे.

कुणालाच जुमानायचे नाही, अशी एकदा अशी भूमिका घेतली की, समोरचाही गप्प बसतो. तो गप्प बसला तरी, त्याच्या मनात अढी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, द्वेषाचे पिक जोमाने बहरू लागते. याच द्वेषाचे आपल्यावरही कधीतरी ‘बूमरॅंग’ होऊ शकेल, याची जाणीव असणे गरजेचे आहे. समोरच्याने ‘ध्यानात ठेवतो’, असा दिलेला इशारा बरंच काही सांगून जातो.  द्वेषाच्या राजकारणाचे फलित कधी चांगले असत नाही. मात्र त्यामुळे कमकुवत शत्रूही आपला स्वार्थ साधण्यासाठी गोंजारू लागतो. हे प्रेम पूतना मावशीचे असते. ते कळले नाही, तर शेवट ठरलेला असतो.

एकूण काय, या वेळीची लोकसभेची निवडणूक द्वेषाने भरलेली आणि भारलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाचा मुद्दा कोसो दूर गेला आहे. हे बीज अंकुरले असले तरी ते फार वाढणार नाही, किंबहुना ते आत्ताच खुडून टाकले नाही, तर जिल्ह्यातील राजकारण सुडाच्या भावनेने पेटल्यास आश्चर्य वाटायला नको.. याचा जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याची जाणीव ठेवणार कोण..?

-ठसकेबाज

747 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग