Breaking News

 

 

महाराष्ट्रात आमचं बरं चाललंय ! : शरद पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी वरचेवर महाराष्ट्रात येवून व्यक्तीगत माझ्यावरच अधिक टीका करतात. याचा अर्थ महाराष्ट्रात आमचे बरं चाललंय, हे स्पष्ट होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विरोधकांच्यात फूट पाडून आपल्या पक्षात घेण्याचा नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीष महाजन आघाडीवर आहेत. राज ठाकरे यांचा मोदी-शहा हे देशाला घातक आहेत म्हणून त्यांना हटवले पाहीजे, असं सांगण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे. संधी मिळेल तिथे सांगत आहेत. ते किंवा त्यांचा पक्ष ही निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगही त्यांच्यावर कारवाई करु शकत नाही. याचा फायदा महाराष्ट्रात आघाडीला होईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात सातत्य असायचे. ते उद्धव ठाकरे यांच्यात दिसत नाही. युती गेली ख़ड्ड्यात म्हणणारे उद्धव ठाकरे हवामान बदलते तसे धोरणे बदलतात. अफजल खानाचा कोथळा काढतो, असं म्हणत त्यालाच मिठी मारायला जातात. त्यांची विधाने व टीकाटिप्पणी सोयीनुसार असते, हे जनतेने ओळखले आहे.

राष्ट्रीय पातळीवर जनतादल आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळे कोल्हापूरात श्रीपतराव शिंदे आमच्याबरोबर राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चुकीच्या लोकांच्या हातातील सत्ता काढून घेणे आवश्यक असल्याने यावेळी निश्चित बदल घडेल, असे चित्र महाराष्ट्रात असल्याचे सांगितले.

753 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *