कोतोली (प्रतिनिधी) : मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणून काम करावे, असे आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले. ते कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात; पण कायद्याचे नियम पाळून साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गणेश उत्सव साजरा करताना पोलीस मित्र म्हणूनही काम करावे, असे आवाहन पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले आहे.

यावेळी गणरायाच्या स्वागतापासून ते विसर्जन कशा पद्धतीने कायद्याच्या नियमांमध्ये राहून करावे, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष तानाजी ढवळे, उपसरपंच पंडित तांबवेकर, पोलीस पाटील शुभांगी जाधव, शिवसेनेचे संभाजी जाधव, मनसेचे जालिंदर चौगुले, शुभम भोसले, युवराज वरुटे यांच्यासह गावातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.