मुंबई  (प्रतिनिधी ) : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर आज उपनेतेही जाहीर केले आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर कार्यकारिणीतील अनेक जागा रिक्त आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेत नेते होते; मात्र त्यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेचे गटनेते पद रिकामी होते.

उद्धव ठाकरे यांनी त्या जागेवर अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची नियुक्ती केली. शिवसेनेची खिंड लढवणाऱ्या किशोरी पेडणेकर यांना आणि ज्येष्ठ नेते गजनान कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दत्ता दळवी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईसह अनेक शहराच्या महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिंदे गट आणि भाजपाला नामोहरम करण्यासाठी ठाकरेंकडून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात येत आहे. पालिकेच्या या निवडणुका शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.