कोल्हापुरी ठसका

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : आज घरोघरी, गल्ली बोळातल्या तालमी, मंडळांमध्ये सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. आपापले दुःख, अडचणी, समस्या विसरून मोठ्या उत्साहाने सर्वांनीच बाप्पाचं स्वागत केलं. त्याच्याकडे सर्वांचं एकच मागणं आहे. ते म्हणजे आम्हा सर्वांचं जगणं सुसह्य कर.

दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेला आहे. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, महागाई, वाहतुकीची कोंडी, फसवणूक, स्त्रियांवरील अत्याचार, जातपात, अवकाळी पाऊस, महापूर, घाणेरडं राजकारण अशा किती तरी समस्यांनी माणूस ग्रासला आहे. कोरोनानं पिच्छा सोडलाय, असं अजून म्हणता येत नाही. रोज नवनव्या आजारांनी लोकांना घेरलं आहे. वयोवृद्धांच्या समस्या वेगळ्याच आहेत. गेल्या दोन वर्षात अनेक जिवाभावाची, जवळची माणसं कायमस्वरूपी मुकली आहेत. या साऱ्यांतून सर्वसामान्य माणूस सावरायचा प्रयत्न करतो आहे; पण माणूस आत्मविश्वास गमावून बसला आहे.

अशा आत्मविश्वास गमावून बसलेल्या लोकांना कुणाच्या तरी पाठबळाची अत्यंत गरज आहे. ही गरज आदी दैवत असणारा गणपती बाप्पा पूर्ण करील, अशी आशा बाळगून लोकांनी बाप्पाचे उत्साही स्वागत केले आहे.

माणसाला सुख, शांती, समाधान, राहायला घर, पोटाला चार घास, स्वस्त औषधोपचार, हाताला यश, मुलाबाळांचे शिक्षण इतक्याच माफक अपेक्षा आहेत. तमाम बळीराजाचं दुःख, कष्ट यातून काहीही केलं तरी सुटका होतं नाही. कधी कमी पाऊस तर कधी तुफान पाऊस. होत्याचं नव्हतं करणारा पाऊस. एकदा पेरणी करताना नाकी नऊ येते. इथे तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ लागली आहे. पिकलंच तर माती मोल किमतीला विकावं लागत आहे. काय करावं त्यानं, हे तरी सांग बाप्पा.

विकास होतो आहे, चकचकीत रस्ते, पूल होताहेत. बुलेट ट्रेन, मेट्रो अनेक शहरात धावू लागल्यात. विमानतळ विकसित होत आहेत. शहरांच्या हद्दवाढी करून सिमेंटची जंगले उभी राहात आहेत; पण माणूस स्वास्थ्य हरवत चालला आहे. अभिमान, स्वाभिमान बाजूला ठेवून सुख, शांती समाधान शोधण्यासाठी धडपडतो आहे; मात्र त्याच्या नशिबात निराशेशिवाय काहीच पडत नाही. बाप्पा तुला लोकांचं दुःख दिसतंय ना?

गेल्या काही वर्षात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिकच रुंदावत चालली आहे. विकासाची गंगा काही मोजक्याच लोकांच्या घरात जाते आहे. त्यांच्या विकासाचा दर बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक आहे. विकासाचा वाटा प्रत्येकाला मिळेल, अशी काही तरी सोय करशील का रे बाप्पा?

माणूस निसर्ग नियमांना अनुसरून वागायचं विसरला आहे. हवा, पाणी, ध्वनी अशा प्रत्येक गोष्टीचं प्रदूषण करतो आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. त्यामुळे दिवसेंदिवस माणसाचा श्वास कोंडतो आहे. पर्यावरणासंबंधी थोडं तरी शहाणपण माणसाला देशील का रे बाप्पा ?

सध्या राजकारणाचा खेळखंडोबा झाला आहे. विश्वस्त, प्रतिनिधी या शब्दांचा अर्थच राजकारणी लोक विसरले आहेत. आपण लोकसेवक आहोत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही. केवळ स्वार्थ साधण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं एकच उद्दिष्ट ठेवून राजकारणी कार्यरत आहे. आम्ही सेवक नाही, मालक आहोत, अशा अविर्भावात ते जगताहेत. अशांच्या मनात गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, गरजू  यांच्या बाबतीत राजकारण्यांची मने संवेदनशील करशील का रे बाप्पा?

बाप्पा, माणसांच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत. त्याही पूर्ण होत नाहीत. काय करावं त्यांनी. रोजच्या जगण्यात त्यांची इतकी ससेहोलपट होतेय की तुझे स्मरण करणं ही सहज शक्य होत नाही. आता आलाच आहेस तर सर्वांचं जगणं सुसह्य करण्याची थोडी तसदी घेतलीस तर अनंत उपकार होतील. मग, लोकांचं जगणं सुसह्य करण्याचा आशीर्वाद देशील ना रे बाप्पा? आमची अपेक्षा आणि खात्री आहे. आमचं मागणं तू नक्की पूर्ण करशील.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

-ठसकेबाज