पुणे (प्रतीनिधी) : पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत झाली. ढोल ताशांच्या गजरात दोन वर्षांनी बाप्पा विराजमान झाले आहेत. मानाचा पहिला श्री कसबा गणपती येथील मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते बप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’च्या आगमनाच मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरु झाली. शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल, विष्णूताद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथकचा देखील समावेश होता. गुरुजी तालीम मंडळ मानाच्या तिसऱ्या मंडळाच्या मिरवणुकीत महिला नादब्रह्म पथक, नगारा वादन, गर्जना पथक आणि श्री ढोल ताशा पथकाचा समावेश होता. मानाच्या चौथ्या तुळसीबाग मंडळाच्या गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा येथील गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून, रमणबाग चौक ते केसरीवाड्यापर्यंत चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवमुद्रा ढोल पथक आणि नगारा वादनदेखील सहभागी झाले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. अखिल मंडई मंडळ शारदा गजाननाची आगमन मिरवणूक फुलांनी सजवलेल्या मंगल कलश रथातून झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक मंदिरातून गरुड रथातून काढण्यात आली.