कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून २०२२-२३ यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ उद्योजक आर. एम. मोहिते यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचा १७ वा स्थापना दिवस गुरुवार, दि. १ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून, या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.

विद्यापीठ स्थापना दिवसानिमित्त गुरुवारी सकाळी ९ वाजता विद्यापीठ आवारात ध्वजवंदन व ध्वजगीत होणार असून, १०.३० वाजता हॉटेल सयाजी येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील केर्ले या लहानशा खेड्यात जन्मलेल्या व तिसरीपर्यंत शिक्षण झालेल्या आर. एम. मोहिते यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग विश्वात प्रचंड मोठे नाव कमावले आहे. दगडाच्या खाणीत काम करणारा सामान्य तरुण ते रस्ते व धरणे बांधणारा ख्यातनाम ठेकेदार व वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी उंची गाठणारा उद्योजक हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल आर. एम. मोहिते यांना डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचे डॉ. मुदगल यांनी सांगितले.

बांधकाम व्यवसायातील यशानंतर त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातही मोठे नाव कमाविले. हातकणंगले तालुक्यात मंगरायाचीवाडी येथे ‘आर. एम. मोहिते टेक्सटाईल्स’ व ‘अभिषेक कॉटस्पिन मिल, तामगाव’ या अत्युच्च दर्जाचे सूत निर्माण करणाऱ्या गिरण्या त्यांनी सुरु केल्या. येथील उत्पादन विविध देशामध्ये निर्यात केले जाते. त्यांनी विविध उद्योगांमध्ये मोठे यश मिळवले आहे.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील आदर्श शिक्षक, व्यवस्थापक पुरस्कार, शांतादेवी डी. पाटील यांच्या नावाने आदर्श ग्रंथपाल, कर्मचारी, सेवक पुरस्कार, तसेच गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कारही या सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत.