कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत व समाजसेवक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

प्राचार्य माळी यांनी सांगितले की, शिक्षण, साहित्य, सामाजिक यासह अनेक क्षेत्रातील डॉ. लवटे यांचे कार्य अव्दितीय आहे. त्यांनी पन्नास वर्षात स्मृतिसंग्रहालय निर्माते, संशोधक, अनुवादक म्हणूनही उत्तुंग काम केले आहे. आपले संपूर्ण जीवन समाजाप्रती अर्पण केलेल्या लवटे यांना आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त झाले आहेत. गतवर्षी त्यांना उत्तर प्रदेशाच्या हिंदी संस्थानने ‘सौदार्ह सन्मान पुरस्कार’ बहाल केला आहे.

प्राचार्य माळी म्हणाले, कोल्हापुरातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांच्या पुढाकाराने डॉ. लवटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी सत्कार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा सत्कार करण्यात येणार आहे.  या सत्कार समारंभात डॉ. सुनीलकुमार लवटे- साहित्य समीक्षा, डॉ. सुनीलकुमार लवटे- बहुविध संवाद व सुनीलकुमार लवटे -बाप आणि अमाप माणूस अशा तीन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

गौरव समितीचे सचिव विश्वास सुतार यांनी सांगितले की, लवटे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश  टाकणाऱ्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्य समारंभापूर्वी सरांच्या साहित्यिक निर्मितीवर आधारित परिसंवाद, चित्रप्रदर्शन व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीत डॉ. लवटे यांच्या सत्कार समारंभाच्या लोगोचे अनावरण कॉ. दिलीप पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. सी. एम. गायकवाड, प्रा. टी. के. सरगर, प्राचार्य प्रविण चौगुले,  अमेय जोशी,  मिलिंद यादव आदी मान्यवर उपस्थित होते.