कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दुध संघाची सभा आज (सोमवार) पार पडली. या सभेत जे सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित होतं तेच झाले.  सत्ताधाऱ्यांनी सकाळपासूनच बोगस सभासद आतमध्ये आणून बसवले. मी माझ्या समर्थक आणि ठरावधारकांसह सभेला गेले असता, हॉल पूर्ण भरला होता. बोगस आणि ढिसाळ नियोजनामुळेच सभासदांना उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे मी स्टेजवर न जाता त्यांच्यासोबत खालीच उभी राहिले. लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांनी आमच्यासमोर ठेवलेला माईकसुद्धा आम्ही तिथून बाहेर पडेपर्यंत बंद ठेवला होता. असा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात संचालिका शौमिका महाडिक यांनी, मोठ्या थाटात सत्ताधारी नेते म्हणाले होते की, सभासदांचं समाधान होउपर्यंत उत्तरे देणार आणि सभा चालवणार. मात्र, प्रत्यक्षात जेंव्हा आम्ही प्रतिप्रश्न विचारत होतो, तेंव्हा सत्ताधाऱ्यांनी पळपुटेपणा दाखवला. दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं धाडस त्यांनी केलं नाही. श्वास न घेता एकसलग वाचन करण्याला समाधान होउपर्यंत उत्तर देणं म्हणतात की सोपस्कार पार पाडणे म्हणतात ?  हे त्यांनी स्वतःला विचारावे असा सवालही त्यांनी केला.

तसेच, जेंव्हा माझ्या लक्षात आलं की इथे आपल्याला समाधानकारक उत्तरं मिळणार नाहीत. एका बाजूने ही सभा हुकूमशाही पद्धतीने रेटली जाते आहे, तेव्हा मी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच हॉलच्या पायरीवर समांतर सभा घेऊन माझे मुद्दे मी  मांडले. आम्ही खुर्च्या उचलल्या नाहीत, हाणामारी केली नाही. हाच आमच्यात आणि आमचे विरोधक आ. सतेज पाटील यांच्यातला फरक आहे.

आम्ही सभेत तुम्ही कुठला ठेका कोणाच्या मेहुण्याला दिला किंवा कोणत्या कंपनीच्या नावावर कुणाची वाहनं घेतली हे विचारायला आलो नव्हतो. पूर्णतः संघाच्या कारभारावर प्रश्न विचारले असूनही त्याला समाधानकारक उत्तरं देऊन चर्चा करण्याचं धाडस यांच्याकडे नाही. नेहमीप्रमाणे सतेज पाटील आले आणि त्यांचे राजकीय गुरू महादेव महाडिक यांच्या नावाचा जप करून बाहेर पडले.

तर, टँकरच्या नावाने दंगा करणाऱ्या या आ. पाटील यांना मी या आधी सर्व व्यवहाराची माहिती दिलेली आहे. आणि तेंव्हाच हे गृहराज्यमंत्री असताना मी हेही सांगितलं होतं की भ्रष्टाचार केला असेल तर केस दाखल करा. सत्तांतर होऊन १ वर्ष झाले तरीही त्यांचे आरोप करण्याची बडबड सुरु आहे. उलट यांची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा मी हाच प्रश्न विचारला की, वेंकटेश्वरा वाहतूक कंपनीला जास्त दर का दिले ? काही भ्रष्टाचार केला का ? तेव्हा यांच्या सत्तेत प्रशासनाने आम्हाला दिलेलं एकमेव लेखी उत्तर असं होतं की, कोणताही भ्रष्टाचार नाही, काही जास्त दर दिला नाही. असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांनी स्वतः किती देवस्थानच्या जमिनी लुटल्या याची आकडेवारीही त्यांना आता लक्षात नसेल. त्यामुळे आ. पाटील यांना वारंवार समजवण्यात काही अर्थ नाही. तरीही त्यांना सविस्तर उत्तरं ऐकायची असतील तर मी उद्या पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे, त्यांनी जरूर यावं, असे आवाहनही शौमिका महाडिक यांनी केले.

सभेमधल्या सर्व नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही त्यांच्याकडे टँकर मागायला आलेलो नाही. कोणता ठेका मागायला आलेलो नाही. त्यांची सत्ता आहे तर त्यांच्या कारभारावर प्रश्न विचारले. त्याची उत्तरं त्यांनी द्यावी. अजून किती दिवस ते आमच्याच नावाचा जप करणार आहेत ? आणि हा प्रश्न आम्हालाच नाही तर सामान्य दूध उत्पादकालाही पडलेला आहे. याआधी विरोधात असणारे केवळ खुर्च्या उचलायला, मारधाड करायला यायचे. परंतु आम्ही जनसमुदाय सोबत असूनही तसं कोणतंही वर्तन न करता, असमाधानकारक उत्तरं असूनही त्यांची त्यांना सभा पूर्ण करू दिली. तर समांतर सभेतून आमचे प्रश्न जनतेसमोर मांडले याचे समाधान आहे. ‘विरोधात असताना कसं वागावं हे त्यांनी आमच्या माणसांकडून नीट शिकून घ्यावे. कारण फार काळ त्यांची ही मग्रूर सत्ता टिकणार नाही.

या सगळयाविरोधात दुधउत्पादकांच्या साथीने आवाज उठवून यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तसेच प्रत्येक दुधउत्पादकालाही मी सांगू इच्छिते की, हा जो संघ तुमच्या घामातून उभा राहिला आहे, तो तुमच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कारण त्यासाठीची कायदेविषयक आणि रस्त्यावरच्या दोन्ही प्रकारच्या लढाईसाठीची धमक आम्ही बाळगून आहोत. आज त्याचं फक्त ट्रेलर दाखवलाय, पिक्चर अभि बाकी असल्याचा टोला गोकुळच्या संचालिक शौमिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.