कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या ३८ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप ‘नवभारत’च्या वतीने कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘बेस्ट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ द इअर’ म्हणून, तर डी. वाय. पाटील ग्रुपला ‘लार्जेस्ट चेन ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

मुंबईतील हॉटेल ऑर्चीड इंटरनॅशनल येथे झालेल्या ‘६ व्या नवभारत राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार’ सोहळ्यात डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व अमृता फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारले. डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाची कायम संलग्नता असलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला २०२० मध्ये ऑटोनॉमस दर्जा मिळाला आहे. ‘नॅक- अ’ श्रेणी व एनबीए मानांकनही प्राप्त  झाले आहे. विद्यार्थ्यांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी विविध संस्था व इंडस्ट्रीशी सामंजस्य करार, उत्तम प्लेसमेंट रेकोर्ड आणि उद्योग क्षेत्रातील मागणी व संधी लक्षात घेऊन तयार केलेला अभ्यासक्रम, सर्वोत्तम सोयीसुविधा या सर्वांची दखल घेऊन डी. वाय. पाटील स्वायत्त महाविद्यालयाची ‘बेस्ट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट’ म्हणून सन्मान करण्यात आला. मेडिकल, पॉलिटेक्निक, नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट आदी विविध शाखामधील शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपला ‘जागतिक व भारतीय पद्धतीचे उत्कृष्ट शिक्षण देणारी व सर्वात वेगाने वाढणारी राज्यातील शैक्षणिक संस्था’ म्हणून यावेळी गौरवण्यात आले.

सर्वोत्तम अभियंते व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम आमच्या सर्वच संस्थांकडून अव्याहतपणे सुरु आहे. कोणत्याही पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याना अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त उत्तम शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.