Breaking News

 

 

जुगार-मटका रोखण्यात कायद्यातील तरतुदींचा अडसर : जिल्हा पोलीस अधीक्षक

कोल्हापूर (विजय पोवार) : जुगार, मटका या बेकायदेशीर व्यवसायावर आळा घालण्यासाठी कायद्याच्या तरतुदी अडसर बनतात, असे खुद्द जिल्ह्याचे पोलीस प्रमुखच म्हणत असतील तर समाजाने काय करावे ? असा प्रश्न पडतो. पण बेकायदेशीर जुगार किंवा मटका खेळणाऱ्या व व्यवसाय चालवणाऱ्यास अटक केली तर त्याबाबत गुन्हा जामिनपात्र आहे. आणि शिक्षेची फारशी तरतुदही नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन अटक झालेले न्यायालयातून जामिनावर लगेच बाहेर येतात. आणि पुन्हा तोच व्यवसाय करतात, अशी हतबलता पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यादवनगरातील मटका अड्ड्यावर कारवाई केलेले पोलीस पथक, या पथकावर मटका चालवणाऱ्याचा प्रतिहल्ला यामुळे जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मटक्याचा विषय पत्रकार परिषदेत पुढं आला. वास्तविक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार पूर्णपणे बंद ठेवण्याची किमया शिवप्रतापसिंह यादव, माधवराव सानप, आर.के.पद्मनाभन् या तत्कालीन पोलीस अधिक्षकांच्या कारकिर्दीत झाल्याचे कोल्हापूरकरांनी अनुभवले आहे.

एखादा प्रशिक्षणार्थी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्ह्यात येतो तेंव्हा मटका किंवा जुगार अड्ड्यावर छापे पडतात. याचा अर्थ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना जे कळते, जमते ते नेहमीच सेवेत असलेल्या पोलीस ठाण्याच्या तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जमत नाही का, असा प्रश्न पडतो. तरीही जुगार, मटका अड्ड्यावर छापे पडतात तेंव्हा खेळणारे आणि खेळवणारे म्हणजेच पंटर, एजंट हेचं लोक सापडतात. मुळ मालकांच्या जवळपासही ही कारवाई पोहचत नाही.

याचा अर्थ पोलीसांना अड्डे व त्यांचे मूळ मालक हे माहितच नसतात का. मटक्याची खोकी तर भर चौकात मुख्य रस्त्यावर बिनदिक्कीत सुरु असतात. तरीही पोलीसांच्या नजरेस पडतच नाही का. असे असेल तर पोलीसातही ‘कलेक्टर’ नावाचा घटक दररोज कोणाला भेटतो आणि काय करतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सांस्कृतिक मंडळांच्या नोंदणीच्या नावाखाली याठिकाणी रमी हा मान्यताप्राप्त खेळ चालतो. असे दाखवून जुगार अड्डा चालवला जातो. पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालवणाऱ्यांमध्ये विशेषतः इचलकरंजी व कर्नाटक सीमाभागात हे मोठ्या प्रमाणात चालते. म्हणूनच काही सांस्कृतिक मंडळांची नोंदणी रद्द करावी, असे प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

तरीही पोलीस अधिकक्षक डॉ. देशमुख यांनी मटका, जुगाराबाबत स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरले आहेच. पण आता पोलीसांवर उलटण्या इतकी मुजोरी मटकेवाल्यांची वाढल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेवून मटक्याला संरक्षण देणाऱ्यांवर करडी नजर आणि थेट मालकावर कारवाई करण्याचे संकेत पत्रकार परिषदेत देशमुख यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा