मुंबई : कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी-४ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चौथा सीझन इतर सीझनपेक्षा वेगळा असेल असे शोचा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर यावेळी वेगळ्या पद्धतीने स्पर्धकांची शाळा घेणार आहेत.

बिग बॉस मराठीचा नवा सीझन, नवे, घर नवे खेळाडू असले तरी कार्यक्रमाचा होस्ट महेश मांजरेकरच असणार आहेत. सगळं नवं असल्याने महेश मांजरेकर त्यांची चावडीवर शाळा घेण्यासाठीही नवी स्टाईल वापरणार आहेत. मांजरेकरांनी शो होस्ट करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

बिग बॉसमध्ये संपूर्ण आठवड्यात स्पर्धकांनी केलेल्या चुका, काढलेल्या खोड्या, घातलेल्या शिव्या सगळ्यांची शाळा मांजरेकर घेतात. अनेकदा स्पर्धकांवर मांजरेकर प्रचंड भडकताना देखील प्रेक्षकांनी पाहिले आहे. बिग बॉस मराठी ४ चा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात मांजरेकर राग शांत करण्याचे १०१ उपायांविषयी बोलत आहेत.

या प्रोमोमध्ये मांजरेकरांच्या हातात राग शांत करण्याचे १०१ उपाय असे पुस्तकही दिसत आहे. ते म्हणतात, ‘यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचे. चिडचीड करायची नाही’.  असे म्हणून मांजरेकर मात्र प्रोमोमध्ये स्वत: हसताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे मांजरेकर खरंच शांतपणे स्पर्धकांची चावडीवर शाळा घेणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.