रांची : फोनवर बोलण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने मुलीला जिवंत जाळले आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर झारखंडमधील दुमका येथे तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत रोष व्यक्त केला, तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
झारखंडमधील दुमका येथे सोमवारी सकाळी अंकिता (वय १७) हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच दुमका येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुकाने आणि बाजारपेठा बंद होत्या. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा अंकिताने अखेरचा श्वास घेतला. २३ ऑगस्ट रोजी अंकिता दुमका येथील जरुवाडी परिसरात तिच्या घरात झोपली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शेजारच्या शाहरुख हुसेन याने खिडकीतून पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या प्रकरणी पोलीस कोठडीत आरोपी शाहरुख हा हसताना दिसला. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप दिसला नाही. त्याच्या देहबोलीवरूनही त्याला कसलीही खंत नसल्याचे दिसून आले.