कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बहुचर्चित गोकुळ दुधसंघाची सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे. अपेक्षेप्रमाणे सभेमध्ये गोंधळाचे वातावरण असून, विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी सभागृहाच्यामध्ये उभारूनच आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील स्टेजवरून वाचन करीत आहेत.

आज सकाळी विरोधक यायच्या आधीच सभागृह पूर्ण भरल्याने विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी यावर आक्षेप घेतला. ठराव धारकांना बसायला जागा न मिळाल्याने महाडिक यांनी स्टेजवर न जाता गर्दीमध्येच थांबणार अशी भूमिका घेतली. महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधून यावर तिव्र नाराजी व्यक्त केली. याचबरोबर सभेमध्ये स्पिकर माईक आणून त्यांनी चेअरमन पाटील यांना सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला असे आवाहन केले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ सुरु आहे.

दुसरीकडे गोकुळचे नेते आ. सतेज पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. ऋतुराज पाटील, माजी आ. के.पी.पाटील यांनी देखील प्रमुख उपस्थिती लावली असून, स्टेजसमोरच खुर्च्या टाकून ठाण मांडले आहे. माध्यमांशी संवाद साधताना आ. पाटील यांनी, विरोधकांना त्यांच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळतील. तसेच निवडणूक अजून लांब असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर आ. मुश्रीफ यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देऊन, हात जोडून गप्प राहणेच पसंत केले.

सभागृहात सभा चालू असून अहवालाचे वाचन सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र, सभागृहात एकच दंगा सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास समांतर सभा घेणार असल्याचे संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले.