Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – जिल्ह्यात दारूचा महापूर

अलीकडे कार्यक्रम, समारंभ कोणताही असो त्यात तर्रर…होऊन सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात युवा पिढीचे प्रमाण अधिक आहे. बेरोजगारी हे त्याचे प्रमुख कारण आहे. सांगायचा मुद्दा काय, तर दिवसेंदिवस दारू जोरात खपायला लागली आहे. दारू रिचवणारे कमी नाहीत. त्यामुळे दारू विक्रीच्या व्यवसायाचा आलेख चढत्या दिशेने जातो आहे.

आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भर उन्हात गावागावात प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यात दारूचा अक्षरशः महापूर आला आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका महिन्याच्या कालावधीत सुमारे ५० लाख रुपयांची देशी, हातभट्टी आणि विदेशी बनावटीची बेकायदा दारू जप्त केली आहे. याप्रकरणी १११ जणांना अटक करण्यात आली असून १३ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.  ही दारू कोण-कोणासाठी आणते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इतकी दारू जप्त करूनही कुठेही दारूचा तुटवडा भासत नाही, हे खरे आश्चर्य आहे. नेमकी किती दारू तयार होते, असा प्रश्न पडतो.

एरवी धान्य, भाजीपाला, दूध यांचा तुटवडा जाणवतो. पण दारूच्या बाबतीत असे कधीही होत नाही. शेकडो परवानाधारक दारूची दुकाने, बिअर शॉपीमध्ये कधीही दारू नाही, असे ऐकायला किंवा फलकही पाहायला मिळत नाही. पकडलेली दारू एवढी तर न पकडलेली दारू किती हाही प्रश्न अनुत्तरित राहतो.

कोल्हापुरात इतर वेळी कोणतीही निवडणूक नसताना वर्षाला कोट्यवधींची दारू खपते. निवडणुकीच्या काळात हे प्रमाण दुपटीने-तिपटीने वाढते. जिल्ह्याच्या सीमा या कर्नाटक व गोवा या दोन राज्यांना जोडल्या आहेत. या दोन्ही राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत दारू स्वस्त आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात या भागातून मोठ्या प्रमाणावर चोरून दारू आणली जाते. सापडणाराच चोर ठरतो आणि न सापडणारा साव ठरतो. एखादा प्रयत्न फसला तरी दारू आणली जाते. आणणारे  पंटर असतात, गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो. खटल्यातून मुक्त कसे करायचे यासाठीची शक्कल अगोदरच तयार असते. खटल्याच्या निकालासाठी वर्षानुवर्षे लागतात. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य कमी होत जाते.

निवडणुकीच्या काळात यापूर्वीही अनेक वेळा दारू पकडली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण पुढे काय झाले, हे कधीच समजत नाही. जप्त केलेली दारू खड्डा काढून त्यात ती नष्ट केली जाते असे सांगितले जाते. पण खड्डा नेमका कुठे आहे, हे न समजणारे कोडे आहे. पोलीस गांजा, चरस यासारखे नशीली पदार्थ गोळीबार मैदानावर आणून ते जाळून टाकतात. तर जप्त केलेली दारू आणि ती आणणारे यांचे काय झाले, हे मात्र गुलदस्त्यातच राहते. फुकट मिळते म्हणून एरवी न पिणारेही पिऊ लागतात. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दारूचा महापूर आला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

One thought on “लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – जिल्ह्यात दारूचा महापूर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग