कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्या (सोमवार) गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. त्याच अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून चेअरमन साहेबांनी लगेच गडबडीत पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यामध्ये अभ्यासपूर्ण उत्तरे असतील अशी माझी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र ती उत्तरे हास्यास्पद निघाली. त्यामुळे चेअरमन साहेबांनी उद्या होणाऱ्या सभेला नीट अभ्यास करुन या, सभेत कोणाही लिहून देणार नाही, असा टोला संचालिका शौमिका महाडिक यांनी विश्वास पाटील यांचे नाव न घेता प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला.

शौमिका महाडिक म्हणाल्या की, तरीसुद्धा मी चेअरमन साहेबांचे आभार मानते. त्याचं कारण असं की, दुधाच्या दरात दिलेली सहा रुपये दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे हे त्यांनी मान्य केलं. त्यांच्या नेत्यांचा वचनपूर्तीचा दावा खोडून काढण्यावरच न थांबता वासाचे दूध परत देणं शक्य नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. ज्यामुळे त्यांच्या नेत्यांची निवडणूक काळातील आमच्यावरील टीका चुकीची होती, हेही त्यांनी सिद्ध केलं. संस्थांची डिबेंचर्सची रक्कम, पशुखाद्य कारखान्यात झालेला तोटा, गरज नसताना घातलेला विस्तारीकरणाचा घाट, दुधाची खालावलेली प्रत, पशुखाद्याची ढासळलेली गुणवत्ता, जिल्ह्यातील संकलनात झालेली घट यांसारखे अनेक प्रश्न शिल्लक आहेत. ज्यांची नेमकी उत्तरं न देता चेअरमन साहेबांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच याशिवाय अजून काही प्रश्न आहेत, ज्यांची विचारणा विविध संस्था प्रतिनिधी सर्वसाधारण सभेमध्ये करतीलच.

तसेच, आज हे पत्रक काढण्याचं कारण इतकंच आहे की, एक हितचिंतक म्हणून मला चेअरमन साहेबांना सांगावसं वाटलं. अजूनही काही तास सभेला शिल्लक आहेत. त्यामुळे सभासदांच्या उत्तरांची पूर्ण तयारी करून, अभ्यास करून मगच त्यांनी सभेला सामोरं जावं. कारण, तिथे  उत्तरं लिहून देण्यासाठी कोणी असणार नाही. ते स्वतः इतकी वर्षे संघाचे संचालक होते, चेअरमन होते आणि आताही आहेत. तर त्यांना संघाच्या बाबतीत सर्व गोष्टींचं ज्ञान असणं अपेक्षित आहे.

त्यामुळे सभासदांच्या प्रश्नांना बगल न देता, दुसऱ्या लोकांना पुढे न करता, समर्थकांकडून गोंधळ न घालता त्यांनी प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित आहे. काल जसं ते कोरोना महामारीमुळे वासाच्या दुधाचे प्रमाण वाढले असे म्हणाले. किमान तशी उत्तरं त्यांनी सभेत देऊ नयेत एवढीच त्यांना करीत असल्याचे संचालिका शौमिक महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.