मुंबई : भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे, ते पाहता महाराष्ट्र व अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्‍वास भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ व बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील अटलांटिक सिटी, न्यूजर्सी येथे बिझनेस समीटचे आयोजन करण्यात आले होते. समीटच्या उद्घाटनप्रसंगी जायस्वाल बोलत होते.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत बृहन्महाराष्ट्र मंडळच्या अध्यक्ष विद्या जोशी, बिझनेस समीटचे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी उपस्थित होते. विद्या जोशी यांनी, भविष्यात या उपक्रमामुळे महाराष्ट्राशी आमचे ॠणानुबंध अजूनही दृढ होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

आनंद चौथाई यांनी, महाराष्ट्र चेंबरने सकारात्मक प्रतिसाद देऊन बिझनेस समीटचे आयोजन यशस्वी केल्याचा अमेरिकेतील महाराष्ट्रीयन समूहास अभिमान असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण व उत्तम बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणारे राज्य आहे. व्यापारात संयुक्त उपक्रमांसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वात उत्तम पर्याय असल्याचे नमूद केले.
उमेश दाशरथी यांनी महाराष्ट्राचे विभागवार वैशिष्ट्यांसह प्रभावी सादरीकरण केले. पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे, रूमादेवी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.

रणधीर जायस्वाल यांनी महाराष्ट्रात नवीन गुंतवणुकीसाठी तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे येणार्‍या प्रस्तावांच्या स्वीकृतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र चेंबरतर्फे जगभरातील विविध देशात राहणार्‍या महाराष्ट्रीयन लोकांच्या संघटनांचे एक सामूहिक व्यासपीठ ‘ग्लोबल महाराष्ट्र फोरम’ या नावाने गठीत केल्याची घोषणा ललित गांधी यांनी केली. या फोरमचे औपचारिक ‘उद्घाटन’ रणधीर जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित विविध उपकमांत अमेरिकेतील विविध राज्यांतून आलेल्या ५ हजारांहून अधिक मान्यवरांनी भाग घेतला. याप्रसंगी दीपक शिकापूर, प्रवीण पाटील, शेखर चिटणीस, विनित पोळ, नितीन इंगळे, श्‍वेता इनामदार, प्रज्ञा पोंक्षे, भाऊसाहेब कालवाघे, रविराज अहिरराव, संजीव तांभोरकर यांनी बैठकांमध्ये सहभाग घेतला.