गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील महागाव येथे बनावट नोटांसह तिघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या कारवाईनंतर गडहिंग्लज तालुक्यात खळबळ माजली आहे.

पोलिसांना खबऱ्यांकडून दोघेजण महागाव येथील पाच रस्ता परिसरात बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवून सापळा लावला. त्यानुसार संशयित तिघांची भेट होताच पोलिसांनी झडप घालत त्यांना पकडले. त्यांच्याकडून बनावट नोटा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अब्दुलरजाक आबासाहेब मकानदार (रा. एकसंबा रोड चिक्कोडी), अनिकेत शंकर हुल्ले (रा. महागाव) आणि संजय आनंदा वडर (रा. शिक्षक कॉलनी नेसरी) अशी त्या तिघांची नावे आहेत.

उपनिरीक्षक वडणे यांच्यासह बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोळी, दादू खोत, दीपक किल्लेदार, गणेश मोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.